१ लाख ५० हजारांची मदत; १९८६-८७एसएससी बॅचकडून निधी सुपूर्द
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी सन १९८६-८७एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी १ लाख ५० हजार रुपयांचा निधी देत शाळेच्या विकासाला हातभार लावला.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देऊन हा निधी संस्थेकडे सुपूर्द केला. संस्थेचा पारदर्शक कारभार, शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या मनात संस्थेविषयी विश्वास निर्माण झाला आहे. या विश्वासातूनच त्यांनी शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी आर्थिक योगदान दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बोलताना माजी विद्यार्थी व मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर यांनी, “हा निधी इमारतीच्या नूतनीकरणासाठी आहे; मात्र त्यामागची भावना संस्थेवरील विश्वासाच्या नूतनीकरणाची आहे. आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठीच वापरला जाईल, असा विश्वास असल्याने माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला,” असे प्रतिपादन केले.
ज्या शाळेने शिक्षण, संस्कार आणि जीवनाची दिशा दिली, त्या शाळेच्या विकासासाठी अनेक वर्षांनंतरही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे शाळेच्या इमारत नूतनीकरणाच्या उपक्रमाला नवी ऊर्जा मिळणार आहे.
या कार्यक्रमास संस्था उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, चिटणीस पंडित तावडे, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, मुंबई कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, अमित साटम, मिलिंद साटम, शाळा समिती सदस्य मंगेश लोके, प्रभारी मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे आदी उपस्थित होते.
तसेच १९८६-८७ एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी सुधीर साटम, संतोष तावडे, रविंद्र डांगवे, सत्यपाल लाडगावकर, गणेश आईर, राजेंद्र साटम, ज्योती प्रकाश मोसमकर आणि सुश्मिता सत्यवान चौकेकर उपस्थित होते.













