Breaking News

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या निधी वितरणातील विलंब दूर करण्याच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणासाठी आवश्यक असलेल्या लेखाशीर्षाच्या निर्मितीस होत असलेल्या विलंबाबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली.
निधी वितरणाची प्रक्रिया विनाकारण प्रलंबित राहू नये तसेच मत्स्यव्यवसायाशी संबंधित विकासकामांना या निधीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करून निधी वितरणाचा मार्ग मोकळा करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध विकासकामांना गती मिळावी आणि उपलब्ध निधीचा योग्य वेळी उपयोग व्हावा, यासाठी विभागीय स्तरावर समन्वयाने कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव व आयुक्त तसेच नियोजन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.